मिष्‍ठान्‍न फूड्स उभारणार धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट

90

मिष्ठान्न फुड्सच्यावतीने गुजरातमधील दलपूर- प्रांतीज (साबरकाठ) येथे धान्यावर आधारित १,००० किलो लिटर प्रती दिन क्षमतेचा इथेनॉल उत्पादन प्लांट उभारण्यात येत आहे. कंपनीने एक्स्चेंजकडील फायलिंगमध्ये ही माहिती दिल्यानंतर मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये २.५२ टक्क्यांची वाढ झाली. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणानुसार हा प्लांट आत्मनिर्भर गुजरात, आत्मनिर्भर गुजरात या उपक्रमांतर्गत उभारण्यात येत आहे.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धान्यावर आधारित इथेनॉल प्लांटसाठी कंपनी २,२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून ५,००० हून अधिक लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. प्रकल्पातून सुमारे ३,५०० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळणे अपेक्षित आहे. प्लांट २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करेल असे नियोजन मिष्ठान्न फुड्सने केले आहे. तांदळाच्या किरकोळ किमती अलिकडेच वाढल्या आहेत. केंद्र सरकारने अलिकडेच तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याशिवाय विविध ग्रेड्सच्या तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क आकारणी केली आहे. त्यामुळे तांदूळ कंपन्यांनाही इथेनॉल निर्मिती प्रकल्पांत प्रवेश करता येणे शक्य झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारताकडून जगभरातील १५० हून अधिक देशांना तांदूळ निर्यात केला जातो. त्यामुळे शुल्कवाढ व निर्यातबंदीचा परिणाम जागतिक स्तरावर अन्नधान्याच्या किंमतीवर होणार आहे. तांदळाच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी २०२१ मध्ये चीनने १.१ दशलक्ष टन तुकडा तांदळाची खरेदी केली होती. मिष्ठान्न फुड्सतर्फे बासमती तांदूळ आणि डाळीसारख्या कडधान्यांचे मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग केले जाते. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २१६ टक्के वाढून ११.०३ कोटी रुपये झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here