अहमदनगर : 2021-22 च्या गळीत हंगामात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने कपात केलेले 109 रुपये शेतक-यांना परत करावेत. तसेच 2022-23 गळीत हंगामाचे रिकव्हरी नुसार प्रतिटन 3 हजार 10 रुपये उसाचे पेमेंट द्यावे, तसे न केल्यास येणाऱ्या गळीत हंगामात ज्ञानेश्वर कारखान्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे कि, 2021–22 मध्ये गळीत झालेल्या उसाच्या ‘एफआरपी’मधून ज्ञानेश्वर कारखान्याने 109 रुपये आसवनी विस्तार वाढीसाठी कपात केली होती. एफआरपी रकमेतुन कोणतीही कपात न करण्याचा केंद्र सरकारचा नियम असताना ज्ञानेश्वर कारखान्याने अनाधिकृतपणे 109 रुपये कपात करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची मुरकुटे यांनी साखर आयुक्तांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. ज्ञानेश्वर कारखान्यावर मोर्चा काढला. धरणे आंदोलनेही केली. त्यानंतर कारखान्याने फक्त 83 शेतकऱ्यांच्या खात्यावर 109 रुपये प्रति टन प्रमाणे पैसे जमा केले. इतरांची मागणी वाढल्याने 109 रुपये परत करणे थांबवले. याप्रश्नी 1 सप्टेंबरला शेतकऱ्यांनी ज्ञानेश्वर कारखान्यावर धरणे आंदोलन केले होते. शिष्टमंडळाशी बोलताना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले कि, याबाबत तात्काळ त्यासंदर्भात आदेश काढला जाणार असून कारखान्याने अंमलबजावणी न केल्यास येत्या गळीत हंगामास परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासन साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुरकुटे यांना दिले.