मुंबईत मान्सून दाखल, जोरदार पावसाने दिला धोक्याचा इशारा

मुंबई : वेळेआधीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनमुळे आज मुंबईकरांसाठी धोक्याचा इशाराही दिला. बुधवारी मुंबईत हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. यासोबतच जोरदार वादळ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दुपारी वादळी वारे वाहतील. यादरम्यान समुद्रात ४.१६ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. त्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

जोरदार पावसाने मुंबईच्या अनेक भागात पाणी साठलेले पाहायला मिळाले. आयएमडी मुंबईचे उप महासंचालक डॉ जयंत सरकार यांनी मान्सून मुंबईत पोहोचल्याचे सांगितले. दहा तारखेऐवजी मान्सून आधीच मुंबईत दाखल झाला आहे. मंगळवारीही पूर्वमोसमी पाऊस झाला होता. आज रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला.

दरम्यान एमएमआरडीएने आतत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. त्यासाठी नागरिकांना हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. नागरिकांनी अडचणी असल्यास मोबाइल क्रमांक ८६५७४०२०९० आणि ०२२-२६५९४१७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा प्रशासनाने पावसाच्या सुरुवातीलाच तलाव, बंधारे आणि धरणांच्या क्षेत्रात प्रतिबंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जलाशयांवर होणाऱ्या दुर्घटना रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्याची यादी जारी करण्यात आली असून पावसाळ्यात या ठिकाणी जाण्यावर निर्बंध असल्याचे सांगण्यात आले आहे. ठाणे तालुक्यातील येयूर, कळवा, मुंब्रा, रेतीबंदर, गायमुख आणि समुद्र किनाऱ्यावर नागरिकांनी एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here