नवी दिल्ली : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सूनबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेदरम्यान केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून त्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते म्हणाले की, जून महिन्यात देशात 33 टक्के पावसाची तूट होती. मात्र जुलैमध्ये मान्सूनमध्ये सुधारणा झाल्याने ही तूट 24 टक्क्यांवर आली आहे. देशातील अनेक भागांत अलीकडे झालेल्या चांगल्या पावसामुळे कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी कमी झाली आहे.
काही राज्यांवर विशेष लक्ष…
उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर चौहान यांनी सांगितले की महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांतील परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यांनी जुलै महिन्यात मान्सून अधिक सक्रिय होईल आणि त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गेल्या वर्षाच्या तुलनेत झाली कमी पेरणी…
केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 350.85 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, ही मागील वर्षाच्या तुलनेत 91.95 लाख हेक्टरने कमी आहे.मान्सून उशिरा आल्यामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मका, बाजरी आणि मूग यांसारख्या कमी कालावधीत येणाऱ्या व कमी पाण्यावर घेता येणाऱ्या पिकांची लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एप्रिलपासूनच सुरू केली होती तयारी…
शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, संभाव्य आव्हान लक्षात घेऊन केंद्र सरकारने एप्रिल महिन्यापासूनच तयारी सुरू केली होती. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्या सहकार्याने संभाव्य प्रभावित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन कृती आराखडे तयार करून राज्यांना पाठविण्यात आले आहेत.जून महिन्यात राबविण्यात आलेल्या ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत देशभरात 1.24 लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, त्याद्वारे 80 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्यात आले.
1.75 लाख क्विंटल बियाण्यांचा साठा तयार…
केंद्रीय मंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत पेरणीवर परिणाम होऊ नये म्हणून सुमारे 1.75 लाख क्विंटल बियाण्यांचा राष्ट्रीय साठा तयार ठेवण्यात आला आहे.याशिवाय किसान क्रेडिट कार्ड (KCC) मोहिमेलाही गती देण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत प्राप्त झालेल्या 1.14 लाख अर्जांपैकी 94 हजारांहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
पीक विमा आणि सतत देखरेख…
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चौहान यांनी सांगितले.तसेच संभाव्य एल निनो लक्षात घेऊन एल निनो मॉनिटरिंग सेल, क्रॉप वेदर वॉच ग्रुप, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष आणि नियुक्त अधिकारी मान्सून, पेरणी, पिकांची स्थिती आणि बाजारपेठेवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकार केवळ परिस्थितीवर नजर ठेवत नाही, तर ठोस नियोजन, पुरेसे संसाधन आणि वेळबद्ध कृती आराखड्याच्या माध्यमातून प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.


















