देशात ५० टक्क्यांहून अधिक कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त

120

नवी दिल्ली : सन २०२०-२१ या हंगामात देशातील ५०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. यापैकी आतापर्यंत २८२ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. यावर्षी ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू राहिलेल्या २२१ साखर कारखान्यांच्या तुलनेत गेल्या वर्षी याच काळात १८६ कारखाने सुरू होते. कारखान्यांनी यंदा ३१ मार्च २०२१ अखेर २७७.५८ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी ३१ मार्च २०२० पर्यंत २३३.१४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यावर्षी उत्पादन सुमारे ४४.४३ लाख टनाने वाढले आहे.

महाराष्ट्रात ३१ मार्च २०२१ अखेर १००.४७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ५९ लाख टन उत्पादन झाले होते. कारखान्यांनी आतापर्यंत जवळजवळ ९६१ लाख टन उसाचे गाळप केले आहे. हे राज्याच्या इतिहासात सर्वाधिक आहे. यापूर्वी २०१७ मध्ये ९५४ लाख टन ऊस गाळप झाले होते. आतापर्यंत ११३ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. तर ७६ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत १४६ पैकी २८ कारखाने सुरू होते.
उत्तर प्रदेशमध्ये १२० साखर कारखान्यांनी ३१ मार्च २०२१ अखेर ९३.७१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. १२० पैकी ३९ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. गेल्यावर्षी ११३ कारखान्यांनी ३१ मार्च २०२० पर्यंत ९७.२० लाख टन साखर उत्पादन केले होते.

कर्नाटकमध्ये ३१ मार्चअखेर ६६ कारखान्यांनी ४१.३९ लाख टन साखर उत्पादन केले आहे. ६६ पैकी ६५ कारखाने बंद झाले आहेत. फक्त एक कारखाना सुरू आहे. गेल्यावर्षी ६३ कारखान्यांनी ३३.५० लाख टन साखर उत्पादन केले होते. या कालावधीत फक्त ३ कारखान्यांचे गाळप सुरू होते. चालू हंगामात सुमारे ४२.५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

गुजरातमध्ये ३१ मार्च अखेर ९.१५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यावर्षी सुरू झालेल्या १५ पैकी ५ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. गेल्यावर्षी ८ कारखान्यांनी ३१ मार्च २०२० पर्यंत गाळप पूर्ण केले होते आणि ८.५० लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.

तमीळनाडूमध्ये २६ साखर कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामात गाळप केले असून गेल्यावर्षी याच काळात २४ कारखान्यांनी उत्पादित केलेल्या ४.७० लाख टन साखरेच्या तुलनेत यंदा ५.०८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उर्वरित राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि ओडिसात एकूण २७.७७ लाख टन साखर उत्पादन ३१ मार्च २०२१ अखेर झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here