भारतीय कृषी संशोधन परिषद आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेडमध्ये सामंजस्य करार

नवी दिल्ली : भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. ‘आयसीएआर’च्या कृषी विस्तारचे उपमहासंचालक डॉ. यू. एस. गौतम आणि धनुका ऍग्रीटेक लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. आर. जी. अग्रवाल यांनी १९ मार्च २०२४ रोजी संबंधित संस्थांच्यावतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

याबाबत डॉ. गौतम म्हणाले की, दोन्ही संस्थांच्या कार्यक्षमतेचा वापर करून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. ते म्हणाले की, देशभरात १४.५ कोटींहून अधिक शेतकरी आहेत, ज्यापैकी बहुतेकांकडे अल्प जमीन आहे. या छोट्या शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाशी संबंधित प्रशिक्षण देण्यासाठी धानुका ॲग्रीटेक केंद्रीय संस्था, अटारी आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी करार करेल.

डॉ. गौतम पुढे म्हणाले की, आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देत आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही. अशावेळी दोन्ही संस्थांनी एकत्रितपणे कृषी उत्पादनाच्या नवीन पद्धतीवर काम करण्याची गरज आहे आणि विशेष म्हणजे ही पद्धत हवामान अनुकूल आहे. बदलत्या वातावरणात नैसर्गिक शेतीला चालना देणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. आर. जी. अग्रवाल म्हणाले की, धानुका ॲग्रीटेक सल्लागार सेवा प्रदान करेल आणि आयसीएआर–एटीएआरआय आणि कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देईल. यावेळी आयसीएआरचे सहायक महासंचालक, संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि आयसीएआर मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here