श्री रेणुका शुगर्स बनली भारतातील सर्वाधिक मूल्याची नोंदणीकृत शुगर फर्म

नवी दिल्ली: श्री रेणुका शुगर्सने ईआयडी पैरी इंडिया लिमिटेड आणि बलरामपूर शुगर्सला मागे टाकून देशातील सर्वाधिक मुल्यवान नोंदणीकृत शुगर फर्मचा बहुमान पटकावला आहे. गेल्या दोन महिन्यात या स्टॉकमध्ये जवळपास ३०० प्रतिशत वाढ झाली आहे.

श्री रेणुका शुगर्सची अलिकडे चांगली कामगिरी दिसून आली आहे. त्यामुळे शेअर बाजारात हा स्टॉक लोकप्रिय बनला आहे. सद्यस्थितीत रेणुका शुगर्सचे बाजारमूल्य (Market capitalisation) ८,३७५.६१ कोटी रुपये आहे. तर ईआयडी पॅरी इंडिया आणि बलरामपूर शुगर्सचे मूल्य त्यापेक्षा कमी आहे. बुधवारी हा शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ३९.३५ रुपये या स्तरावर पोहोचला. २७ एप्रिलनंतर शेअर २९५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या वीस पैकी १८ सत्रात अप्पर सर्किट नोंदवले गेले आहे.

अलिकडेच कंपनीने इथेनॉल क्षमता विस्ताराची घोषणा केली असून त्यासाठी ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनीने सांगितले की, संचालक मंडळाने इथेनॉल उत्पादन क्षमता प्रती दिन १४०० किलो लिटर करण्यास मंजुरी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात संचालक मंडळाने इथेनॉल क्षमता ७२० किलो लिटर प्रती दिन या स्तरावरून वाढवून ९७० किलो लिटर करण्यास मंजुरी दिली होती.

केंद्र सरकारने सध्याच्या ७.७९ टक्के इथेनॉल मिश्रणाच्या तुलनेत २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर साखर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सनी उसळी घेतली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here