नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका पाठोपाठ एक कंपनी खरेदी करण्याचा धडाका कायम ठेवला आहे. त्यांच्या पोर्टफोलिओत आणखी एक मोठी अमेरिकन कंपनी समाविष्ट होणार आहे. RIL ने यूएस बेस्ड सॉफ्टवेयर डेव्हलपर सेंसहॉक इंकसाठी ३२ मिलियन डॉलरची डील केली आहे. याद्वारे अंबानी या कंपनीत ७९.४ टक्के हिस्सा खरेदी करतील.
आजतकवर प्रकाशित वृत्तानुसार, मुकेश अंबानी आपल्या सौर ऊर्जा योजनांना पाठबळ देत आहेत. मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी अमेरिकन कंपनी SenseHawk Inc मधील बहुसंख्य हिस्सेदारी मिळविण्यासाठी ३२ मिलियन डॉलर (जवळपास २५५ कोटी रुपये) च्या करारावर स्वाक्षरी केली, असे बिझनेस टुडेने म्हटले आहे. या डीलनंतर शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्सनी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. रिलायन्सचे शेअर १ टक्क्यांनी वधारून २,५९८ रुपयांवर ट्रेड करीत होते. आम्ही रिलायन्स परिवारात सेंसहॉक आणि त्यांच्या गतिमान टीमचे स्वागत करतो असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. सेंसहॉकची स्थापना २०१८ मध्ये झाली असून कॅलिफोर्नियास्थीत ही कंपनी सौर ऊर्जा उत्पादनाशी निगडीत सॉफवेअर आधारित मॅनेजमेंट टुल्स तयार करते.