मुंबईचे तापमान ३८ अंशांवर, हवेत उष्णता वाढली

मुंबई : राज्यात सर्वाधिक कमाल म्हणजे ३८.१ अंश तापमानाची नोंद मुंबईत करण्यात आली. मोसमातील सर्वाधिक तापमान मुंबईत नोंदविण्यात आले. सांगली, सोलापूर या ठिकाणचा पाराही ३५ अंशापलिकडे पोहोचला. हवामान विभागाच्या अनुमानानुसार मंगळवारी मुंबईच्या किमान तापमानातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार किमान तापमान २४ अंश, तर कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्यीच शक्यता आहे. जमिनीलगत वाहणारे प्रभावी दक्षिण-पूर्व वारे आणि आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे मंगळवारीही तापमानात वाढ होणार आहे.

पारा चढल्यामुळे मुंबईकर सोमवारी उकाडय़ाने हैराण झाले. शहराच्या तुलनेने उपनगरात आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. मात्र शहरात दुपारी उकाडा वाढला. गेल्या दहा वर्षांत मार्च २०१५ आणि २०१७ मध्ये मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा वर गेले होते.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर रविवारी सायंकाळी कमाल तापमान ३२.६ अंश, तर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान १९.८ अंश होते. सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईचे कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअसवर पोहचले. कुलाबा येथे ३४.७ अंश तापमान नोंदविण्यात आले. सांताक्रूझ येथील कमाल तापमानात सरासरीपेक्षा ७.६ अंश, तर कुलाबा येथे सरासरीपेक्षा ५.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली.

राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान होते. विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झाली, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे १२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here