नागवडे साखर कारखान्याकडून श्रीगोंदा नगरपालिकेला ५० हजार तर ग्रामपंचायतींना मिळणार १० हजार: अध्यक्ष राजेंद्र नागवडे

श्रीगोंदा: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी ‘नागवडे’ कारखाना श्रीगोंदा नगरपालिकेला ५० हजार रुपये तर तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० हजार रुपयांचा तातडीचा मदतनिधी देणार असल्याची माहिती ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. गरज पडल्यास स्थानिक प्रशासनाला देखील आर्थिक सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे नागवडे यांनी यावेळी सांगितले.

याबाबत माहिती देताना नागवडे म्हणाले की, सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. कोरोनाचे संकट मोठे असून सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे. तालुक्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही ही दिलासादायक बाब आहे. तरी देखील तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे .या कठिण परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे.घाबरुन न जाता आवश्यक ती खबरदारी घेतल्यास आपण या संकटापासून स्वतःचे,कुटूंबाचे व आपल्या समाजाचे अन् देशाचेही संरक्षण करु शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने श्रीगोंदा नगरपालिकेसह प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर काम सुरू आहे. या कामांसाठी नागवडे कारखान्याने मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे.नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे व मुख्याधिका-यांच्या मागणी प्रस्तावानुसार श्रीगोंदा नगरपालिकेला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देणार असून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी १० हजार रुपयांचा तातडीचा मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांनी कारखान्याकडे मदतनिधी मागणी प्रस्ताव कारखान्याकडे समक्ष किंवा ई-मेलद्वारे पाठवावेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या ग्रामपंचायतीला १० हजार रुपयांचा मदतनिधी तातडीने वर्ग केला जाईल. या निधीचा वापर कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना, गरजूंना जिवनावश्यक वस्तू पुरवठा, अन्नदान, निर्जंतुकीकरण,औषध फवारणी तसेच रुग्णांवरील औषधोपचार व सॅनिटायझर ,मास्क खरेदी यासाठी केला जाणे अपेक्षित आहे असेही नागवडे म्हणाले.

यावेळी नागवडे पुढे म्हणाले, ‘नागवडे’ कारखान्याकडून देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असून कारखाना आवारात तसेच कार्यस्थळाच्या परिसरासह कामगार वसाहत,कारखान्यावरीर दुकानचाळ परिसर,श्री लिंगाळेश्वर मंदिर परिसर निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नगरपालिका आणि ग्रामपंचायतीना मदतनिधी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु, गरज पडल्यास या कामी स्थानिक प्रशासनाला देखील आर्थिक सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करावे आणि स्वतःसह समाजाची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक व संचालक मंडळ उपस्थित होते .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here