रोजंदारी कामगारांच्या संपामुळे नानपारा साखर कारखाना बंद

बहराईच : नानपारा येथील श्रावस्ती शेतकरी सहकारी साखर कारखान्यात रोजंदारी कामगारांनी पगारवाढीच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी काम बंद आंदोलन सुरू केले. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अनेक चर्चेच्या फेऱ्या केल्या. मात्र, त्यामध्ये अपयश आले. कामगार संपावर उतरल्याने कारखाना बंद झाला आहे. नानपारा साखर कारखान्यात जवळपास २०० रोजंदारी कामगार काम करतात. कामगारांनी सांगितले की, त्यांना २०० ते २२० रुपये मजुरी मिळते. इतक्या कमी पगारात काम करणे अशक्य आहे. हे कामगार लोडर, पंप आणि मीलमध्ये अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतात. तरीही त्यांना चांगली मजुरी मिळत नाही. गेल्या काही वर्षात मजुरीत १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. याबाबत कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. मात्र, कामगार आपल्या भूमिकेवर ठाम राहीले.

मुख्य ऊस अधिकारी संजय सिंह यांनी सांगितले की, कामगार संपावर गेल्यामुळे कारखान्याच्या कामावर परिणाम झाला आहे. बहुतांश कामे रोजंदारी कामगार करतात. कामगार मजुरी वाढीच्या मागणीवर ठाम आहेत. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शेर बहादूर सिंह यांनी सांगितले की, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडचणी आहेत. कारखान्याच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आता कामगारांना अतिरिक्त लाभ देणे शक्य नाही. जिल्ह्यातील इतर कारखान्यांतील कामगारांपेक्षा नानपारा कारखान्यातील मजुरांना अधिक वेतन आहे. दरम्यान, कामगारांच्या संपामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस वजन केंद्रे बंद असल्याचे शेतकरी राम सिंह वर्मा, राम मनोहर, बुद्धी लाल आदींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here