राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने 2024 या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले परिणाम केले घोषित; समूह वीज निर्मितीत 6% आणि करोत्तर नफ्यात 25% वाढ

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ अर्थात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा उपयोगिता महामंडळाने 76,015 मेगा वॅट इतक्या स्थापित समूह क्षमतेसह, 24 मे 2024 रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले.

एनटीपीसी समुहाने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 422 अब्ज युनिट इतकी सर्वाधिक वार्षिक वीज निर्मिती नोंदवली. आर्थिक वर्ष 2023 मधील 399 अब्ज युनिट्सच्या तुलनेत त्यात 6 टक्क्याने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये एनटीपीसीची एकत्रित वीजनिर्मिती 362 अब्ज युनिट्स होती, ज्यात मागील वर्षातील 344 अब्ज युनिट्सच्या तुलनेत 5 टक्क्याने वाढ नोंदविण्यात आली.

आर्थिक वर्ष 2024 साठी एनटीपीसीचे एकूण उत्पन्न 1,65,707 कोटी रुपये इतके होते, तर मागील वर्षीचे एकूण उत्पन्न 1,67,724 कोटी रूपये इतके होते. आर्थिक वर्ष 2024 चा करोत्तर नफा 18,079 कोटी रुपये इतका होता, जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये 17,197 कोटी रुपये होता. अर्थात त्यात 5 टक्क्याने वाढ झाली.

आर्थिक वर्ष 2024 मध्ये महामंडळाचे एकूण उत्पन्न 1,81,166 कोटी होते, ज्यात मागील वर्षीच्या 177,977 कोटींच्या तुलनेत 2% वाढ नोंदविण्यात आली. आर्थिक वर्ष 2024 साठी मंडळाचा करोत्तर नफा 21,332 कोटी होता. ज्यात मागील वर्षाच्या 17,121 कोटी करोत्तर नफ्याच्या तुलनेत 24.60% टक्क्याने वाढ नोंदवली गेली.

आर्थिक वर्ष 2024 साठी, एनटीपीसीने आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून, प्रति समभाग 3.25 रुपयाच्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. आर्थिक वर्ष 2024 साठी एकूण 4.50 रुपये प्रति समभाग अंतरिम लाभांश नोव्हेंबर 2023 आणि फेब्रुवारी 2024 मध्ये गुंतवणूकदारांना आधीच दिला गेला आहे. मागील वर्षीच्या 7.25 रुपये प्रति समभागाच्या तुलनेत पूर्ण वर्षासाठी एकूण लाभांश 7.75 रुपये प्रति समभाग असेल. कंपनीने लाभांश देण्याचे हे सलग 31 वे वर्ष आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here