कराडजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखली

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी कराड तालुक्यातील वाठार आणि पाचवड फाटा येथे ऊस वाहतूक रोखली. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी ४०० रुपये आणि चालू एफआरपी साडेतीन हजार जाहीर न करताच साखर कारखाने सुरू केले आहेत. त्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चार दिवसांत एफआरपी जाहीर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अडवलेले उसाचे ट्रॅक्टर साखर कारखान्यांकडे मार्गस्थ करण्यात आले. जयसिंगपूर येथे ‘स्वाभिमानी’चे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील वर्षीच्या उसाला ४०० रुपये व चालू वर्षाच्या उसाला साडेतीन हजार रुपये उचल जाहीर करावी अशी मागणी केली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने ऊसदर जाहीर केलेला नाही.

आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी वाठार आणि पाचवड फाटा येथे ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर अडवून आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, देवानंद पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे, पक्ष उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, रमेश पिसाळ आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here