नेपाळ: साखर कारखान्यांकडे बिले थकल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष

85

काठमांडू: साखर कारखान्यांकडून अतिशय संथ गतीने ऊसाचे पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. कारखान्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला किती पैसे दिले याची माहीती द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

२८ डिसेंबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आल्यानंतर काठमांडूमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने ७२ वर्षीय शेतकरी नारायण यांचा मृत्यू झाला होता.

प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा सिया राम यादव याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यादव कुटूंब दरवर्षी आपल्या पाच एकर जमिनीत ऊस पिकवून तो अन्नपूर्णा साखर कारखान्याकडे गाळपास पाठवते.

मात्र, कारखान्याने त्यांना वेळेत ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे यादव कुटूंबाला पैशांसाठी उधार-उसनवारी करावी लागली. सिया राम यादव म्हणाले, आता माझ्याकडे काही शिल्लक राहिलेले नाही. बँकांचे कर्ज चुकविण्यासाठी आम्हाला शेताची विक्री करावी लागेल.

दरम्यान, उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि प्रवक्ता नारायण रेगमी म्हणाले, आमच्याकडे उपलब्ध असलेल्या रेकॉर्डनुसार साखर कारखान्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना ८५ टक्के ऊसाचे पैसे दिले आहेत. अद्याप १५ टक्के देणी शिल्लक आहेत. साखर कारखाने हळुहळू शेतकऱ्यांना पैसे देत आहेत. आणि आमची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळतील.

मात्र, सरकारचा हा दावा चुकीचा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राकेश मिश्रा म्हणाले, शेतकऱ्यांना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत.

साखर कारखान्यांनी किती शेतकऱ्यांना पैसे दिले हेही स्पष्ट केलेले नाही. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार विविध साखर कारखान्यांनी एकूण ९०० कोटी रुपये थकवले आहेत. तर सरकार आणि साखर कारखान्यांच्या म्हणण्यानुसार ही थकबाकी ६५० कोटी रुपयांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here