काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बालेंद्र शाह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी आपल्या एका महिन्याचा पगार पंतप्रधान आपत्ती मदत निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.पंतप्रधान कार्यालयाने (PMO) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सोशल मीडिया पोस्टद्वारे या निर्णयाची माहिती दिली.नेपाळ सरकारने कृषी सामग्री कंपनी लिमिटेडला भारताकडून २५ हजार मेट्रिक टन डीएपी खत खरेदी करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. ही खरेदी सरकार-ते-सरकार (G2G) पद्धतीने केली जाणार आहे.तसेच, पुरामुळे बाधित नागरिक आणि व्यावसायिक संस्थांसाठी मदत व पुनर्वसन पॅकेज तयार करण्याचे निर्देश अर्थ मंत्रालयाला देण्यात आले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, बुधवारी रसुवागढी, भोटेकोशी नदी परिसर आणि खालच्या किनारी भागात आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्ती व व्यावसायिक संस्थांसाठी हे मदत व पुनर्वसन पॅकेज तयार केले जाणार आहे.रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तसेच बचाव, मदत आणि पुनर्बांधणीच्या कामांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती.
२६ ऑगस्ट रोजी तिबेट-नेपाळ सीमेवर आलेल्या अचानक आलेल्या महापुरामुळे परिस्थिती गंभीर झाली. पुराच्या जोरदार प्रवाहामुळे पाणी, गाळ आणि मोठमोठे दगड भोटेकोशी व त्रिशूली नदीच्या प्रवाहातून वाहून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पुरानंतर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. द काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, बचावकार्यात सहभागी यंत्रणांनी आतापर्यंत ४७५ मृतदेह शोधून काढले आहेत.पूरग्रस्तांसाठी मदत व पुनर्वसन पॅकेज तयार करण्याचा निर्णय आणि पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील सदस्यांचा एक महिन्याचा पगार आपत्ती मदत निधीत देण्याचा निर्णय हा प्रभावित नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.















