२०२३-२४ मध्ये नेदरलँड बनले भारताचे तिसरे सर्वात मोठे निर्यात स्थान

नवी दिल्ली : २०२३-२४ या वर्षात देशाच्या व्यापारी मालाच्या निर्यातीमध्ये ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली असली तरी अमेरिका आणि यूएईनंतर नेदरलँड्स हे भारताचे तिसरे मोठे निर्यात स्थान म्हणून उदयास आले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात नेदरलँड्सच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे. यातील प्रमुख वस्तूंमध्ये पेट्रोलियम उत्पादने (१४.२९ अब्ज डॉलर), इलेक्ट्रिकल वस्तू, रसायने आणि फार्मास्युटिकल्स यांचा समावेश आहे.

मागील आर्थिक वर्षात नेदरलँडसोबत भारताचा व्यापार अधिशेष १३ अब्ज डॉलरवरून २०२२-२३ मध्ये १७.४ बिलियन डॉलर झाला आहे. नेदरलँड्सने यूके, हाँगकाँग, बांगलादेश आणि जर्मनीसारख्या प्रमुख देशांना मागे टाकले आहे. नेदरलँड्सला २०२२-२३ मध्ये झालेल्या २१.६१ अब्ज डॉलरच्या निर्यातीच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये भारताची निर्यात सुमारे ३.५ टक्क्यांनी वाढून २२.३६ अब्ज डॉलर झाली असल्याचे डेटामधून दिसून येतो. युरोपियन देशांसाठी २०२१-२२ आणि २०२०-२१ मध्ये, आउटबाउंड शिपमेंट्स अनुक्रमे १२.५५ अब्ज डॉलर आणि ६.५ अब्ज डॉलर होती.

२०२१-२२ मध्ये, नेदरलँड हे भारतीय निर्यातीसाठी पाचवे सर्वात मोठे गंतव्यस्थान होते. तर २०२०-२१ मध्ये ते नवव्या क्रमांकावर होते. व्यापार तज्ज्ञांच्या मते, नेदरलँडमधील कार्यक्षम बंदरे आणि रस्ते, रेल्वे आणि जलमार्ग याद्वारे युरोपचे केंद्र म्हणून उदयास आले आहे.

मुंबईस्थित निर्यातदार आणि टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शरद कुमार सराफ म्हणाले की, निर्यातीतील वाढीचा कल भविष्यातही कायम राहील. नेदरलँड हे युरोपचे प्रवेशद्वार आहे, कारण तेथील बंदरे अतिशय कार्यक्षम आहेत. भारत आणि नेदरलँड्सने १९४७ मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून दोन्ही देशांनी मजबूत राजकीय, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध विकसित केले आहेत. उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार २०२२-२३ मधील २७.५८ अब्ज डॉलरच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये किरकोळ घसरून २७.३४ अब्ज डॉलर होण्याची अपेक्षा आहे.

नेदरलँड्स हा जर्मनी, स्वित्झर्लंड, यूके आणि बेल्जियमनंतर भारताचा युरोपमधील प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. फिलिप्स, अक्ज़ो नोबेल, डीएसएम, केएलएम आणि राबोबँक यांच्यासह २०० हून अधिक डच कंपन्यांची भारतात उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे, नेदरलँड्समध्ये २०० हून अधिक भारतीय कंपन्या कार्यरत आहेत, ज्यात टीसीएस, एचसीएल, विप्रो, इंफोसिस, टेक महिंद्रा तसेच सन फार्मास्युटिकल्स आणि टाटा स्टील यांसह सर्व प्रमुख आयटी कंपन्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here