महाराष्ट्रात चित्रपटगृहे, कॉलेज, हॉटेल्ससाठी नवे निर्बंध, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस फैलावला आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्हे, शहरांमध्ये लॉकडाउन आणि नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र, बेफिकीर नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. अशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने राज्य सरकारची चिंता वाढवली आहे.

१४ मार्च रोजी कोरोना संक्रमितांची संख्या १६,६२० होती. सोमवारी हा आकडा १५०५१ वर पोहोचला. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेत, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

नागपूरमध्ये २१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले आहे. तर पुण्यात ३१ मार्चपर्यंत दररोज रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू लागू असेल. पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. तर औरंगाबादमध्ये ४ एप्रिलपर्यंत दररोज रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत लॉकडाउन असेल. ठाण्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे.

राज्य सरकारने चित्रपटगृहे, कार्यालये, मॉल, रेस्तराँ, हॉटेल्स ५० टक्के क्षमतेवर कार्यान्वीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. लग्नसमारंभात फक्त ५० पाहुणे असतील तर अंत्यसंस्काराला २० जणांना उपस्थित राहता येईल. याशिवाय कोरोना रुग्णांच्या हातावर शिक्काही मारला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here