साखर उद्योगातील नवे तंत्रज्ञान आर्थिक विकासाला बळ देईल : दौलत देसाई

सांगली : राजारामबापू शुगरटेकने बायोरिफायनरी संबंधित कोर्सेस सुरू करावेत. साखर उद्योगातील नवे तंत्रज्ञान आर्थिक विकासाला बळ देईल. कारखान्यांतून बाहेर पडणारे प्रत्येक उत्पादन मूल्यवर्धित झाल्यास सर्वच घटकांचा विकास होईल यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. इस्लामपूर येथील राजारामबापू शुगर टेक्नॉलॉजी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक बी. डी. पवार होते. या कार्यक्रमात देसाई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

दौलत देसाई म्हणाले की, पवार परिवाराने ‘शुगर टेक’च्या माध्यमातून तरुणांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. जागतिक स्पर्धेत टिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागात निर्माण होत आहेत. शुगरटेकच्या विद्यार्थ्यांनी संशोधन उपक्रम व तंत्रज्ञानातून स्वत:ला अद्ययावत ठेवले पाहिजे. उमेश पवार, अनिल शिंदे, आकाश चव्हाण यांची भाषणे झाली. किरण पाटील, व्ही. डी. जाधव, दीपा भंडारे, पी. बी. कणसे, अमोल लकेसर यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रिया आरेकर, सायली ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला क्रांती कारखान्याचे अनिल शिंदे, शुगरटेकचे संचालक उमेश पवार, व्ही. आर. कलेढोणकर, प्रा. आर. एम. पवार, अभिजित मगदूम यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here