नाइट कर्फ्यू, विवाह थांबल्याने कोल्ड्रिंक व्यवसायाला फटका

लखनऊ: कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा अनेक लोकांचे काम ठप्प झाले आहे. एकीकडे व्हायरस वाढल्याने लोक आपल्या घराकडे परतले आहेत. तर अनेकांच्या रोजगारावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. कोरोना संक्रमणामुळे पु्न्हा एकदा कोल्ड्रिंक व्यवसाय थंड पडला आहे. राजधानी लखनौमध्ये वार्षिक १०० कोटींची उलाढाल या व्यवसायात होते. त्यातही मार्च ते जून या महिन्यांमध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. तो आता जवळपास ४० टक्क्यांनी घटला आहे.

कोल्ड ड्रिंक व्यावसायिकांच्या मतानुसार, कोरोना व्हायरस आणि लग्न समारंभ पुढे ढकलले गेल्यामुळे सुमारे आठ कोटी रुपयांच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच शाळा, कॉलेज, ऑफिसेस बंद आहेत. नाईट कर्फ्यू सुरू आहे. त्यामुळे शॉपिंग मॉल, चित्रपटगृहे, हॉटेल-रेस्टॉरंटही रात्री आठ वाजता बंद होतात. त्यामुळे मालाची विक्री होत नाही. अनेक लोक कोरोनामुळे थंड पदार्थांचे सेवन करण्यास घाबरत आहेत. परिणामी गेल्या दोन महिन्यात फक्त १२ कोटी रुपयांची विक्री झाली आहे. खरेतर मार्च ते जून या कालावधीत चांगला व्यवसाय होतो असे कोल्ड ड्रिंक डिस्ट्रीब्यूटर्सनी सांगितले. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यातही चांगली विक्री होते. मात्र, आता मे महिना सुरू असूनही व्यवसाय शून्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

लखनौमध्ये १०८ वितरक
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये विविध कोल्ड्रिंक कंपन्यांचे १०८ डिस्ट्रिब्यूटर आहेत. इतरवेळी मार्च ते जून या काळात कंपन्या आणि वितरकांचे टार्गेट पूर्ण होते. आता व्यवसाय ४० टक्क्यांनी घटल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here