नितीन गडकरी, भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी) ही नवी कार सुरक्षा मूल्यांकन व्यवस्था सुरू करणार

(भारत एनसीएपी) ही बहुप्रतिक्षित नवी कार सुरक्षा मूल्यांकन व्यवस्था, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, 22 ऑगस्ट 2023 रोजी सुरू करणार आहेत. ही व्यवस्था म्हणजे, भारतात 3.5 टनांपर्यंतच्या मोटर वाहनांचे सुरक्षा मानक वाढवून, रस्ता सुरक्षेत वाढ करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेच्या दिशेने टाकलेले, एक महत्त्वाचे पाऊल आहे.

बाजारात उपलब्ध असलेल्या मोटार वाहनांच्या अपघात प्रतिबंधक सुरक्षेचे तुलनात्मक मूल्यांकन करण्यासाठी, कार ग्राहकांना एक माध्यम उपलब्ध करुन देणे हा या व्यवस्थेचा उद्देश आहे. या अंतर्गत, कार उत्पादक स्वेच्छेने, मोटार-वाहन उद्योग मानक (एआयएस) 197 नुसार आपल्या कार/वाहनांची चाचणी करुन, बाजारात विक्रीसाठी आणू शकतात. चाचण्यांमध्ये कार/वाहनाने बजावलेल्या कामगिरीच्या आधारावर, कारला अॅडल्ट ऑक्युपन्ट्स (AOP) आणि चाइल्ड ऑक्युपंट्स (COP) अशी, बाल किंवा प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेली स्टार मानांकने दिली जातील. या मानांकनांच्या आधारावर, कार ग्राहक वेगवेगळ्या वाहनांच्या सुरक्षा मानकांची तुलना करुन त्यानुसार, कोणते वाहन खरेदी करायचे याबाबत निर्णय घेऊ शकतील.

या प्रणालीमुळे सुरक्षित वाहनांची मागणी वाढेल आणि ग्राहकांची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कार उत्पादक सुद्धा अशाच वाहनांचे उत्पादन वाढवतील, अशी अपेक्षा आहे. वाहनांच्या दर्जेदार सुरक्षा मानकांमुळे भारतीय बनावटीच्या कार जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या दृष्टीने परदेशी कारच्या तोडीस तोड कामगिरी बजावतील आणि त्यामुळे भारतातल्या कार उत्पादकांची कारनिर्यात क्षमता सुद्धा वाढून, भारताची एकंदर कार निर्यात वाढेल. या प्रणालीमुळे भारतात सुरक्षा केंद्रस्थानी मानून कार/वाहन निर्मिती करणारी बाजारपेठ विकसित होणे अपेक्षित आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here