नितिन गडकरी उद्या १०० टक्के इथेनॉल-इंधनाच्या टोयोटा इनोव्हा कारचे करणार लाँचिंग

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या, मंगळवार २९ ऑगस्ट २०२३ रोजी टोयोटाच्या इनोव्हा कार (Toyota’s Innova car)च्या १०० % इथेनॉल-ईंधन इंजिन असलेल्या मॉडेलचे अनावरण करतील. मंत्री गडकरी यांनी मींट शाश्वत विकास परिषदेत बोलताना ही माहिती दिली.

मंत्री गडकरी वाहन उत्पादकांना पर्यायी इंधनावर चालणारी आणि हरित वाहने आणण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. गेल्यावर्षी त्यांनी टोयोटा मिराई ईव्ही ही हायड्रोजनवर चालणारी कार लॉन्च केली होती. मंत्री गडकरी म्हणाले की, २९ ऑगस्ट रोजी मी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी (टोयोटा) इनोव्हा कार लॉन्च करणार आहे. याबाबत पीटीआयच्या वृत्तानुसार, ही जगातील पहिले BS-VI (Stage-II), इलेक्ट्रिक फ्लेक्स-इंधनाची कार असेल.

ते म्हणाले की, २००४ मध्ये देशात पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर त्यांनी जैवइंधनामध्ये रस घेण्यास सुरुवात केली. आणि यासाठी त्यांनी ब्राझीलला भेट दिली. गडकरी यांच्या मते जैवइंधन आश्चर्यकारक काम करू शकते. पेट्रोलियम पदार्थांवरील आयातीचा खर्च कमी करू शकते. बर्‍याच प्रमाणात परकीय चलनाची बचत करू शकते. गडकरी म्हणाले की आपल्याला तेल आयात शून्यावर आणावी लागेल. सध्या यासाठी १६ लाख कोटी रुपये खर्च होतात. हे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान आहे. भारताला अधिक शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे, कारण देशात प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.

मंत्री गडकरी म्हणाले, हवा आणि जलप्रदूषण कमी करण्याची गरज आहे. आपल्या नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. या वर्षाच्या अखेरीस द्वारका द्रुतगती मार्गाच्या बांधकामासह ६५,००० कोटी रुपयांचे विविध रस्ते प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे, असेही मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here