तर खासदारकीचा राजीनामा देईन, सुजय विखेंची भरसभेत घोषणा

राहुरी: भाजपा नेते आणि खासदार सुजय विखे यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोपाचे खंडन करताना सुजय विखेंनी तर मी खासदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान विरोधकांना दिले आहे. कारखान्यात सुजय विखेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी झालेल्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुजय विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील होते. विखे म्हणाले, कारखान्यातील कर्मचारी तसेच सभासदांचे मोठे सहकार्य लाभल्याने गेली दोन गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.

ते पुढे म्हणाले, गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिल्यास आपण संचालक पदासह खासदारकीचा देखील राजीनामा देऊ. राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्‍वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिला आहे. कारखान्यापुढे असंख्य संकटे असल्याने त्यासाठी कारखान्याच्या अतिरिक्त जमिनी विकण्याचा एकमेव पर्याय उरला. या जमिनीचा विक्री केली, तरच तनपुरे कारखाना वाचू शकेल, असे विखे यांनी म्हटले. अध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले, गेल्या गळीत हंगामात तनपुरे कारखान्याने 3 लाख 36 हजार 115 मेट्रिक टनाचे गाळप करून 3 लाख 94 हजार 600 पोती साखर तयार झाली.

डॉ. तनपुरे साखर कारखान्याचा उतारा नगर जिल्ह्यातील उत्कृष्ट साखर उतारा असणार्‍या कारखान्यांपैकी एक ठरला. कारखान्यास जिल्हा बँकेने कर्जाचे पुनर्गठन करून दिल्याने डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

To Listen to this News click on the button below the image.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here