नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेला आता पूर्णविराम मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर भारतातील काही राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या राज्यांमध्ये अद्याप उष्णतेची लाट सुरू होती. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज युपी, राजस्थानसह काही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर दिल्लीतही पाऊस होईल असे अनुमान आहे. हवामान विभागाने सांगितले की, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत किमान तापमान ३२ तर कमाल तापमान ४३ पर्यंत असेल. याशिवाय राजधानीत पावसाची शक्यता आहे.
आजतकच्या वृत्तानुसार, आयएमडीने गुजरातमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. अहमदाबादमध्ये किमान तापमान २७ तर कमाल तापमान ३८ राहील. मध्य प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. राजधानी भोपाळमध्ये आज किमान तापमान २६ तर कमाल तापमान ३८ डिग्री सेल्सिअस राहील. चंदिगढमध्ये किमान तापमान ३१ तर कमाल तापमान ४३ डिग्री सेल्सिअस असेल. उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये किमान तापमान २५ तर कमाल तापमान ४१ डिग्री सेल्सिअस असेल. याशिवाय राजस्थानमधील जयपूरमध्ये किमान २८ तर कमाल ४१ डिग्री सेल्सिअस सापमान राहील. जयपूरमध्ये पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. युपीतील लखनौमध्ये किमान ३१ आणि कमाल ४३ डिग्री सेल्सिअस तापमान असेल.
याशिवाय बिहारची राजधानी पाटणात आज ढगाळ हवामान राहील. येथे किमान २७ तर कमाल ४१ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. स्कायमेटच्या अंदाजानुसार आज मध्य प्रदेश, कोकण, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकात हलका पाऊस होईल. याशिवाय अंदमान आणि निकोबार, छत्तीसगढ़, दिल्ली, यूपी, राजस्थान, झारखंडच्या काही भागातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.