महांकाली साखर कारखान्याला सांगली जिल्हा बँकेची नोटीस

सांगली : कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याने त्रिपक्षीय कराराचा भंग केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या कर्जाला ओटीएसचा लाभ न देता नियमित व्याजासह वसुली का करू नये, अशी नोटीस सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महांकाली साखर कारखान्यास बजावली आहे.

कारखान्याची जमीन विक्री करून सप्टेंबर २०२३ अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज फेडण्याबाबत कारखाना, जिल्हा बँक व शिवलँड कंपनी यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता. डीआरएटीने या कराराला मान्यता दिली. मात्र कारखान्याने कर्ज परतफेड केलेली नाही. त्यामुळे करारातील अटींचा भंग झाला असून महांकाली साखर कारखाना थकीत कर्जासाठी सिक्युरिटायझेशन अॅक्टअंतर्गत जिल्हा बँकेने जप्त केला. या कारखान्याचा बँकेने लिलाव जाहीर केला, मात्र लिलावास प्रतिसाद न मिळाल्याने बँकेने कारखाना खरेदी केला.

याप्रश्नी कारखान्याने डीआरटीकडे दाद मागितली होती. कारखान्याने जिल्हा बँकेच्या ताब्यातील ८० एकर जमीन विक्री करून कर्ज परतफेड करण्याची तयारी केली होती. डीआरटीने कारखान्याच्या प्रस्तावाला होकार दिला. मात्र, जिल्हा बँकेने डीआरएटीकडे अपील केले होते. कारखान्याने ठरलेल्या हप्त्यानुसार कर्ज परतफेड केलेली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने मार्चनंतर या कर्जाला नियमीत व्याज आकारणी सुरू केली आहे. आता नोटीस बजावली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here