बुलंदशहर : जिल्ह्यातील दोन आणि हापूडमधील दोन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ९२ कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अनुपशहर साखर कारखाना वगळता वेव्ह, ब्रजनाथपूर आणि सिंभावली या तीन कारखान्यांना नोटीस बजावली आहे. थकीत ऊस बिले देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली असून जर शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत, तर हंगामात ऊस पुरवठा रोखला जाईल असा इशारा कारखान्यांना दिला आहे. याबाबत सरकारला आणि विभागालाही पत्र पाठवले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात १.३० लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील वेव्ह साखर कारखाना, अनामिका कारखाना, साबितगढ कारखाना आणि अनुपशहर कारखान्याला ऊस पाठवला आहे. याशिवाय जिल्ह्याबाहेरील हापूडमधील सिंभावली व ब्रजनाथपूर तसेच संभल मधील रजपुरा साखर कारखाना आणि अमरोहामधील चंदनपूर साखर कारखान्याकडूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जातो. साबितगढ, अनामिका, रजपुरा आणि चंदनपूर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के बिले दिली आहेत. तर वेव्ह, अनुपशहर, सिंभावली आणि ब्रजनाथपूक कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. विभागाने कारखान्यांना अनेकदा नोटीस बजावली आहे. तरीही चारही कारखाने पैसे देऊ शकलेले नाहीत. वेव्ह कारखान्यानकडे १२.४८ कोटी रुपये तर अनुपशहर कारखान्याकडे २४.२४ कोटी रुपये थकीत आहेत. सिंभावली कारखान्याने २८.६३ कोटी रुपये आणि ब्रजनाथपूर कारखान्याने २५.६६ कोटी रुपये थकवले आहेत. कारखान्यांना १५ दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर कारवाई केली जाईल, असे जिल्हा ऊस अधिकारी कुमार पटेल यांनी सांगितले.