पिलीभीत : उत्तर प्रदेशातील पिलिभीतमध्ये एक शेतकरी ऊस मशीनद्वारे तोडून त्याचे बियाणे तयार करतो. हरजीत सिंह या शेतकऱ्याच्या या बियाण्यांना एवढी मागणी आहे की, आता ते गावात ऑफिस सुरू करून तेथे बियाण्यांची विक्री करतात. शेतकरी तेथे येऊन बियाणे तोडून घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना आता या नव्या पद्धतीची जोड आपल्या शेतीला मिळाली आहे.
याबाबत आजतक डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, २००८ मध्ये हरजीत आयर्लंडमध्ये एमबीए शिक्षणासाठी गेले होते. शिक्षणानंतर त्यांना तेथे चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. परदेशात नोकरी, चांगले पॅकेज, चांगली लाइफस्टाइल सोडून २०१६ मध्ये हरजीत आपल्या घरी भावाकडे परतले. मार्केटिंगची पदवी, आपल्या भावाची शेती, तेथील अनुभव पाहून शेतीत काहीतरी नवे करायचे असे त्यांनी ठरवले. शेती क्षेत्राशी निगडीत नवी माहिती ते सोशल मीडियावरून मिळवू लागले. हरजीत यांनी २०१६ मध्ये मशीनद्वारे ऊसाचे बियाणे तयार केले. त्याचा वापर स्वतःच्या शेतात केला. त्यात फायदा मिळवून आज ते १० एकर शेतात बियाणे तयार करतात. हरजीत सांगतात की, ऊस उत्पादक शेतकरी लावण करताना उसाचे दोन तुकडे करून त्याचे रोपण करतात. यात खूप ऊस वाया जातो. आम्ही मशीनद्वारे याची तोडणी करतो. त्याची उगवण क्षमता ८० टक्के आहे. त्यापासून उत्पादकताही वाढते. खर्च कमी येतो. हरजीत यांनी ट्रे मध्ये रोप लागणही केली आहे. आधी याचे उत्पादन आणि नंतर त्याचे मार्केटिंग. यासाठी एमबीएचा अनुभव त्यांना मोलाचा ठरतो. ते ऑनलाईन बियाणे विक्री करतात. जवळपास पंचवीस कुटुंबे हरजीत यांच्या कामाशी जोडली गेली आहेत. गावातील खुल्या बाजारातही ते याची विक्री करतात. मशीनद्वारे एसटीपी तंत्राने ते बियाणे तयार करतात. ३० ते ४० क्विंटल बियाण्यासाठी २०,००० रुपयांचा खर्च येतो.