एनव्हीपी साखर कारखान्यातर्फे चाचणी गळीत हंगामाचा प्रारंभ

धाराशिव : जागजी (ता. धाराशिव) येथील एन.व्ही.पी.साखर कारखाना उसाला प्रतीटन २ हजार ७०० रुपये भाव देणार असल्याची घोषणा खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली. साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास खा. राजे-निंबाळकर यांनी व्यक्त केला. धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही. पी. शुगर प्रा. लि., या कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी गव्हाणीत उसाची मोळी टाकून झाला. त्यावेळी ते बोलत होते.

जागजी येथील ज्येष्ठ नागरिक रंगनाथराव सावंत गुरुजी, ह.भ.प. नवनाथ महाराज-चिखलीकर, शेतकरी हनुमंतराव देशमुख, ह.भ.प. काकासाहेब डांगे, तानाजी मगर, भारत लोमटे, सुभाष पाटील, अभिजीत मगर, सुधाकर साळुंखे, आत्माराम सरडे, अनुरथ भोसले, तुळशीदास जमाले, काकासाहेब मिसाळ, जहाँगीर सय्यद, बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते गळीत हंगाम प्रारंभ करण्यात आला.

खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, या कारखान्याचा नफा हा प्रथम ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाहन पुरवठादार, बॅक व शेवटी मालक अशी भूमिका घेणारा प्रायव्हेट क्षेत्रातील हा एकमेव कारखाना आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. या भागात साखर कारखाना उभा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. नानासाहेब पाटील म्हणाले की, चार किंवा पाच ऑक्टोबरला कारखाना सुरू होईल. शेतकऱ्यांनी देखील ऊस गळपासाठी देताना गुणवत्ता, परिपक्वता व साखरेचे प्रमाण बघून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील, कुलदीप पाटील (विटेकर), स्वराज ट्रॅक्टरचे डीलर हिम्मतराव पाटील, सचिन शिंदे व साई श्रुती इंडस्ट्रीजचे सोमनाथ जानते, आप्पासाहेब पाटील, धनंजय पाटील व नानासाहेब पाटील आदी उपस्थित होते. दौलत निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले. नानासाहेब पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here