तेल विपणन कंपन्यांची इथेनॉल मिश्रण १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी एक नोव्हेंबरपासून २०२३-२४ पुरवठा वर्षात सर्व स्त्रोतांकडून ८.२३ अब्ज लिटर इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी निविदा जारी केल्या आहेत. त्यातून १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी बोलीची कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. याची वैधता ३१ जुलै २०२४ पर्यंत आहे. बोली लावणाऱ्याला विहित कालावधीत विहित प्रमाणात याचा पुरवठा करावा लागेल असे म्हटले आहे.

उसाचा रस, साखर, साखर मोलॅसेस/बी हेवी मोलॅसेस/सी हेवी मोलॅसेस, खराब झालेले धान्य, मका, एफसीआयकडून मिळालेला अतिरिक्त तांदूळ आणि त्यांचे प्रमाण यासारख्या विविध स्रोतांपासून उत्पादित इथेनॉलचा पुरवठा करावा. ओएमसींनी २०२२-२३ मध्ये ६.५१ लाख लिटर इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यापैकी जुलै अखेरपर्यंत सुमारे ३.५१ अब्ज लिटरचा पुरवठा झाला आहे. त्यापैकी ८२ टक्के इथेनॉल पुरवठा साखरेवर आधारित इथेनॉल आणि उर्वरित धान्यापासून बनवलेले इथेनॉल म्हणून करण्यात आला.

दरम्यान, ट्रूअल्ट बायोएनर्जीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विजय निराणी म्हणाले, २० टक्के मिश्रण पातळीकडे आपण पुढे जात असताना इथेनॉल उद्योग २०२५ पर्यंत ५०० टक्क्यांनी वाढेल. अशा परिस्थितीत मागणी वाढून १०.१६ अब्ज लिटर होईल. त्यामुळे हा उद्योग ९,००० कोटी रुपयांवरून ५०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here