ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या (ETWG) चौथ्या बैठकीच्या निमित्ताने, गोव्यामध्ये स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय(CEM) 14 व्या आणि मिशन इनोव्हेशनच्या आठव्या बैठकीचा प्रारंभ

भारताच्या जी-20 अध्यक्षतेअंतर्गत ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या (ETWG) चौथ्या बैठकीला काल(19 जुलै 2023) गोव्यामध्ये सुरुवात झाली. या मुख्य कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय 14 व्या आणि मिशन इनोव्हेशनच्या आठव्या बैठकीला देखील मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आणि यामध्ये 34 पेक्षा जास्त सदस्य देश सहभागी झाले होते. भारत सरकारकडून अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर स्वच्छ ऊर्जाविषयक त्रिसदस्यीय मंत्रीगटाच्या(सीईएम) इतर सदस्यांचे( अमेरिका आणि ब्राझिल) विशेष संबोधन आणि सीईएम आणि एमआयच्या सचिवांची भाषणे झाली. “स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने एकत्रितपणे आगेकूच” ही या वर्षाची संकल्पना आहे.

सीईएम बैठकीच्या पहिल्या दिवशी सीईएम कार्य समन्वयक, आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधक, धोरणतज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि इतरांसह 800 पेक्षा जास्त अभ्यागतांची उल्लेखनीय उपस्थिती दिसून आली. या व्यतिरिक्त, या कार्यक्रमामध्ये 50 पेक्षा जास्त भागीदारांकडून 30 उप-कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ऊर्जा कार्यक्षमता, स्वच्छ इंधने, स्वच्छ ऊर्जा, वाहने आणि उद्योगांमधील कार्बनमुक्ती अशा विविध संकल्पनांचा या उप-कार्यक्रमांमध्ये समावेश होता.

सीईएम-14 आणि एमआय-8 या बैठकांमध्ये सार्वजनिक उपयुक्ततेचे तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारतात आणि जगभरात झालेल्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे दर्शन घ़डवण्यात आले. गोव्यात श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 19 ते 22 जुलै, 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञान आणि संस्कृती प्रदर्शनाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोव्याचे ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अजय तिवारी आणि ऊर्जा कार्यक्षमता विभागाचे महासंचालक अभय भाक्रे उपस्थित होते. तंत्रज्ञान प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहने, हाय़ड्रोजन आणि जगभरातील इतर स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान पहायला मिळणार आहे. वाहने आणि चार्जिंग पायाभूत सुविधा शोकेस (SIAM, TERI, CALSTART आणि Drive to Zero यांच्या वतीने), मिशन इनोव्हेशन (विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने) आणि क्लीन टेक स्टार्ट अप (TERI) या तीन विभागांमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ऍग्नेल पॉलिटेक्निकच्या 130 विद्यार्थ्यांचा पहिला गट या तंत्रज्ञान प्रदर्शनात सहभागी झाला.

गोव्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक प्रदर्शनाचे आयोजन गोवा सरकारकडून करण्यात येत आहे.

सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व अभ्यागतांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार असून त्यामध्ये प्रत्यक्ष संवादाद्वारे माहिती घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

व्यावसायिक बँका, बहुस्तरीय विकास बँका, सरकार आणि उद्योग प्रतिनिधींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ‘फायनान्सिंग कार्बन कॅप्चर, यूजेज अँड स्टोरेज’ या विषयावर एक सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्बन व्यवस्थापन प्रकल्प अधिक आकर्षक बनवण्यासाठी धोरणे आणि कल्पना आमंत्रित करण्यावर या कार्यक्रमाचा मुख्य भर होता.

‘जागतिक कार्बन व्यवस्थापन आव्हान’ या कार्यक्रमात या धोरणाच्या अंमलबजावणीत यश मिळवून देणाऱ्या महत्त्वाच्या घटकांवर प्रकाश टाकण्यात आला, ज्यामध्ये कार्यक्षम प्रोत्साहन देणारा धोरण आराखडा, योग्य आर्थिक आराखडा आणि भूगर्भीय कार्बन डायऑक्साइड संचयन संधींचे वेळेवर मूल्यांकन या मुद्द्यांचा समावेश होता.

नॉर्डिक ग्रीन व्हॅलीने ‘हायड्रोजन – द नॉर्डिक रॅली टू द व्हॅली आणि नॉर्डिक ग्रीन सेलिंग’ या विषयावर आयोजित केलेल्या सत्रात नॉर्डिक (डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फीनलंड, आइसलँड, फॅरो बेटे, ग्रीनलँड आणि आलॅंड या देशांचा समूह) आणि इतर देशांमधील दृढ सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण यासोबतच जलद नवोन्मेष आणि हायड्रोजन व्हॅलीच्या तैनातीला गती देण्याच्या विविध पर्यायांवर विचार करण्यात आला.

स्वच्छ इंधनावरील सत्रात अक्षय ऊर्जा, रसायने आणि साहित्य तयार करण्यासाठी बायोमासच्या योग्य वापराचा आवश्यक विस्तार कमी करण्यासाठी बायोमास फीडस्टॉक्सचे शाश्वत उत्पादन आणि वापराशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे, शाश्वत, उत्पादक वापरासाठी उपलब्ध असलेल्या बायोमासच्या प्रमाणातील अनिश्चिततेमुळे जैव-आधारित उत्पादनांच्या भविष्यातील मागणीवर गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होण्यासारख्या समस्येवरही चर्चा करण्यात आली.

‘कॉलेबरेशन फॉर ॲडव्हान्सिंग ग्लोबल ॲक्शन ऑन सस्टेनेबल कूलिंग’ या सत्रात जागतिक कृतीला प्रोत्साहन देताना चर्चेचा प्रमुख विषय म्हणून शाश्वत शीतकरणावर भर देण्यात आला. COP आणि COP28 अंतर्गत आयोजित जागतिक कार्यक्रम, उष्णताग्रस्त देशांच्या गरजांवर तसेच हवामान-अनुकूल आणि शाश्वत शीतकरण यासोबतच तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी मजबूत आणि प्रमाणात तयारी करण्याबाबत तसेच प्रतिसाद देण्याबाबत विचार करण्याची एक अभिनव संधी प्रदान करतात.

‘गीगाटन अपॉरच्यूनिटी उपक्रम’ या कार्यक्रमात, खाजगी आणि सार्वजनिक भागधारकांच्या युतीने ‘गीगाटन स्केलवर उपाय शोधण्यासाठी आणि COP28 मधील संबंधित भागधारकांना धोरणे सादर करण्यासाठी सहयोग करण्यास सहमती दर्शविली. हे आवाहन या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल संमेलनाच्या (UNFCCC) जागतिक नवोन्मेष केंद्राकडून करण्यात आले होते. ‘एनर्जी कॉम्पॅक्ट्स’ या सत्रात, स्वच्छ ऊर्जा भविष्यासाठी भारताचे समर्पण आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG7) ची वचनबद्धता सरकारी भागीदार, खाजगी क्षेत्रातील भागधारक आणि बहु-क्षेत्रीय सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या विविध महत्वाकांक्षी ऊर्जा कॉम्पॅक्ट्सद्वारे अधोरेखित करण्यात आली. सार्वत्रिक ऊर्जा उपलब्धतेत प्रगती करत असताना शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे हा या कॉम्पॅक्ट्सचा प्राथमिक उद्देश आहे.

शून्य कार्बन उत्सर्जनाचा पाठपुरावा करण्यासाठी कार्बन वजा करण्याच्या विविध तंत्रज्ञानाच्या शक्यता या देखील पहिल्या दिवशी चर्चेचा भाग होत्या. मंडळाच्या सदस्यांनी निसर्ग-आधारित उपाय, डायरेक्ट एअर कॅप्चर आणि कार्बन कॅप्चर तसेच स्टोरेज यासह विविध पद्धतींचे फायदे आणि तोटे तपासले, सोबतच इच्छित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या संभाव्य समन्वयांचीही पडताळणी केली. या चर्चेत तांत्रिक अडथळ्यांवर विचार करण्यात आला तसेच कार्बन वजा करण्याच्या तंत्रज्ञानाचा अवलंब आणि विस्ताराला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण आणि नियमनाच्या महत्त्वावरही भर देण्यात आला.

स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या गरजा आणि सहकार्याच्या शक्यतांवर प्रकाश टाकण्यासाठी देखील एक सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात विशेष करून तांत्रिक मार्ग, उपलब्ध माहिती मधील तफावत कमी करणे यावर चर्चा झाली तसेच सहयोगी संशोधन आणि विकास (R&D) प्रयत्न प्रभावीपणे ही दरी कशी भरून काढू शकतील यावरही विचार करण्यात आला.

21 जुलै 2023 रोजी मंत्रिस्तरीय बैठक होणार आहे, तर 22 जुलै रोजी एका पाठोपाठ एक अशा जी-20 ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय बैठका होणार आहेत.

या बैठकांसोबत आयोजित इतर कार्यक्रमांची संपूर्ण यादी कार्यक्रम पत्रिकेमध्ये उपलब्ध आहे. ही कार्यक्रम पत्रिका येथे पाहता येईल.

जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये जागतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

CEM/MI च्या संकेतस्थळावर येथून प्रवेश केला जाऊ शकतो: https://www.cem-mi-india.org/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here