लखनौ : राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाटी करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा तसेच अनोख्या उपायांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी आणखी एक पाऊल उचलले. ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ज्ञानाच्या पडताळणीसाठी ७ मे २०२२ रोजी विभागीय विषयांशी निगडीत ऑनलाईन दक्षता परीक्षा घेण्यात आली. या ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा नियंत्रक म्हणून उत्तर प्रदेश साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक रमाकांत पांडे यांना जबाबदारी देण्यात आली होती.
याबाबत माहिती देताना भुसरेड्डी म्हणाले की, ऊस विकास विभागाच्या मुख्यालयातून जारी होणारे आदेश, प्रपत्र, बुकलेट, माहितीपत्रक तसेच इतर उपयुक्त सूचना, निर्देशांचे पालन अधिकारी, कर्मचारी स्तरावर केले जाते की नाही याची पडताळणी करण्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ऊस विकास विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या पाच वर्षात घेतलेले सकारात्मक निर्णय, महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचा समावेश होता. या योजनांच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिकाऱ्यांना सर्व विभागीय प्रपत्रांची माहिती असणे गरजेचे आहे. मुख्यालयातून जारी करण्यात येणारे आदेश, प्रपत्र, सुचना, दिशा-निर्देश खूप विस्तृत असतात. त्यांचा अभ्यास केल्याशिवाय शेतकऱ्यांना योग्य सूचना देणे शक्य नाही. अशा स्थितीत परीक्षा या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या ज्ञानाची पारख करणे आणि त्यांना ऊस विकास विभागाच्या कामकाजासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विभागीय परीक्षा ७ मे २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ऑनलाईन घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १५० प्रश्नांच्या या परीक्षेत योग्य उत्तराला २ गुण तर चुकीचे उत्तर दिल्यास निगेटिव्ह १ गुण अशी पद्धती होती. परीक्षेतील गुणांच्या आधारावर अधिकाऱ्यांच्या वार्षिक कार्यपद्धती अहवालावर खास टिप्पणी असले. ऑनलाईन दक्षता परीक्षेत राज्यातील ऊस विकास विभागातील २३१ अधिकाऱ्यांच्या सहभाग होता. परीक्षेनंतर १५ मिनिटात निकाल जाहीर करण्यात आला. अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले. अनेक अधिकाऱ्यांनी ३०० गुणांपैकी २८६ गुण मिळवले. ऊस विभागातील अधिकाऱ्यांमध्ये या परीक्षेबाबत उत्साहवर्धक स्थिती होती.
अशा प्रकारच्या परीक्षांतून अधिकाऱ्यांच्या ज्ञानात भर पडते. अधिकाऱ्यांकडून विभागाचे नवे आदेश, दिशा – निर्देश, शासन आदेशांचे अवलोकन केले जाते. त्यातून शेतकऱ्यांना चांगली सेवा देण्यासाठी मदतच होईल. अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या परीक्षा वारंवार घेतल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.