कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील ३२ पैकी केवळ सात साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता देण्याची तयारी दर्शवली आहे. उर्वरीत साखर कारखान्यांपैकी अनेकांनी अद्याप प्रस्ताव सादर केलेले नाहीत. तत्कालिन जिल्हाधिकारी रेखावार यांच्या उपस्थितीत २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत ज्या साखर कारखान्यांनी २०२२-२३ या हंगामातील उसाला उताऱ्यानुसार एफआरपी ३००० रुपये किंवा त्यापेक्षा जादा असल्यास संबंधित साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता म्हणून प्रती टनास ५० रुपये तर ३ हजार रुपयांच्या आत एफआरपी दिलेल्या कारखान्यांनी प्रती टन जादा १०० रुपये दुसरा हप्ता देण्याचे ठरले होते.
तत्कालिन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उसाला प्रतिटन ५० व १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यास कारखान्यांनी असमर्थता दर्शवली आहे. याबाबत कारखान्यांना प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे आवाहन केले होते. मात्र दोन महिने लोटले तरी अद्याप साखर कारखान्यांकडून प्रस्ताव दिलेले नाहीत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना काय भूमिका घेणार ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.