नवी दिल्ली : ओपेक आणि सहयोगी देशांच्या पाच देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. यापूर्वी त्यांनी या गोष्टींवर निर्बंध लागू केले होते.
गेल्या काही दिवसांत युएईने उत्पादन वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर पेट्रोलियम पदार्थ्यांच्या निर्यातदार देशांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर या समुहाने यासंदर्भात होणारी बैठकही टाळली होती.
रविवारी याबाबत एका निवेदनात म्हटले आहे की, इराक, कुवेत, रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातने आपल्या उत्पादन वाढीस सहमती दर्शविली आहे. याबाबत सौदी अरेबीयाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजिज बिन सलमान यांनी सांगितले की ज्या गोष्टी आम्हाला एकत्र ठेवतात, त्या माध्यमांपासून खूप दूर आहेत. काही बाबतीत आमचे विचार वेगळे असतील. मात्र, आम्ही एकत्र आहोत. या मुद्यावर ओपेक देशांमध्ये सहमती कशी झाली याची माहिती देणे त्यांनी टाळले. सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने भारताने ओपेक देशांकडे उत्पादन वाढविण्याची मागणी केली होती.