माळेगाव कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात विरोधकांचा खोडा: ॲड. जगताप, तावरे यांचा आरोप

पुणे:माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २४० केएलपीडी इथेनॉल प्रकल्पाबाबत घेतलेला निर्णय हा केंद्र तसेच राज्य शासनाच्या नियमानुसार आहे.केंद्र शासनाची बदलती धोरणे पाहता विरोधक जसे सांगतात तसा ५०० केएलपीडी क्षमतेचा इथेनॉलचा प्रकल्प हा फायद्याचा ठरणार नाही. त्यामुळे तोटा होण्याचीच शक्यता आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष अॅड.केशवराव जगताप व माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, अनिल तावरे यांनी केले.विरोधक केवळ विरोधासाठी खोडा घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जगताप व तावरे म्हणाले की, २४० केएलपीडी इथेनॉल प्रकल्पामुळे गाळप हंगामात ५ कोटी २४ लाख लिटर इथेनॉल आणि ९ लाख ६० हजार पोती साखर उत्पादित होईल.कारखान्याचा बेस ८० टक्के साखर उत्पादन व २० टक्के उपपदार्थ असा आहे.विरोधकांच्या सांगण्यानुसारचा ५०० केएलपीडीचा प्रकल्प व्हेपर रूट या नवीन तंत्रावर अवलंबून आहे.देशात सध्या हे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. इथेनॉल विक्रीतून मिळणारी रक्कम २१ दिवसांत नव्हे तर उशीरा मिळतो. ५०० केएलपीडी प्रकल्प केल्यानंतर गाळप क्षमता १० हजार मे. टन प्रती दिन करावी लागेल.त्यासाठी २० कोटींचा खर्च येईल. २४० केएलपीडी इथेनॉल उत्पादनानंतर सभासदांना २०० ते २५० रुपये जास्तीचा भाव देता येऊ शकतो. विरोधकांच्या म्हणण्यानुसार ५०० केएलपीडीच्या प्रकल्पासाठी १९५ कोटी खर्च येईल.मात्र, त्यासाठी इतर अटी आहेत.जास्तीचे २० कोटी आणि इन्सिरिनेशन बॉयलरसाठी ६० कोटी असा ८० कोटींचा खर्च परवडणारा नाही.त्यामुळे एकूणच ५०० केएलपीडी प्रकल्पापेक्षा २४० केएलपीडी प्रकल्प हा केंद्र शासनाच्या बदलत्या धोरणाला अनुसरून तसेच कारखान्याच्या साखर उत्पादनाशी निगडित आहे. तोच फायद्याचा ठरेल, असे मत जगताप व तावरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here