मुजफ्फरनगर : ऊस पिकावर पुन्हा टॉप बोरर किडीचा फैलाव दिसू लागला आहे. हवामानातील बदलांबरोबरच गतीने या पिकाला मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी सावध राहून पिक वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, ज्या पानावर किडीची अंडी दिसतील, ती पाने तोडून नष्ट करावीत असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृ्त्तानुसार, खतौली साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. अशोक कुमार आणि महाव्यवस्थापक कुलदिप राठी यांनी सांगितले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावांना भेटी देण्यात आल्या आहेत. यांदरम्यान, ऊस पिकावर सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात पांढऱ्या रंगाची फुलपाखरासारखे किटक बसल्याचे दिसून आले. या किटकाकडून पानांच्या तळाच्या बाजूला अंडी दिली जातात. त्यामुळे पिकाचे जबरदस्त नुकसान होते. अशी अळीग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढून जाळून टाकली पाहिजेत. कारखान्याचे महा व्यवस्थापक कुलदिप राठी यांनी सांगितले की, कोरोजेनची फवारणी करून शेतकरी या किडीला हटवू शकतात. याशिवाय, फरटेरा, व्हर्टिकाचाही वापर करावा. शेतकऱ्यांनी ऊस लागणीवेळी जर बिज प्रक्रिया योग्य पद्धतीने केली असेल तर नुकसान कमी होते असे वरिष्ठ ऊस व्यवस्थापक विनेश कुमार आणि ऊस विभागाचे प्रमुख विनोद मलिक यांनी सांगितले. खतौली कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी भौराकला, सिसौली, मुंडभर, भौराखुर्दसह दहा गावांचा दौरा केला. यावेळी संजीव कुमार, गुलाब सिंह, संदीप कुमार, गजेंद्र सिंह आदी उपस्थित होते.