खरीप हंगाम आता अंतिम टप्प्याजवळ येत आहे. यातील मुख्य पिक असलेल्या भाताची कापणी, मळणी सुरू आहे. तर आधी लागवड केलेले भात पिक पक्व झाले आहे. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून हे पिक मंडईत आणण्यात येत आहे. त्यामुळे काही राज्यात याची खरेदी प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर सरकारने एक ऑक्टोबरपासून किमान समर्थन मूल्यावर (एमएसपी) भात खरेदी सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर मध्य प्रदेश सरकारकडूनही याची तयारी सुरू झाली आहे. हरियाणात एक ऑक्टोबरपासून खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी ४०० मंडयांमध्ये तयारी करण्यात आली आहे.
टीव्ही ९ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, हरियाणा सरकारने या खरीप हंगामात ५५ मेट्रिक टन भात खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांना खरेदीनंतर ७२ तासात पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रभारी सरकारी अधिकारी याची व्यवस्था पाहील. तर पंजाबमध्ये १८०० भात खरेदी केंद्रे असतील. जास्तीत जास्त भात पिक मंडआयांमध्ये पोहोचावे यासाठी नियोजन करण्यात येत असून १९१ लाख मेट्रिक टन भात खरेदी केले जाईल असे अनुमान आहे. जम्मू-काश्मीर सरकारने १ ऑक्टोबरपासून भात खरेदी सुरू करण्याची तयारी केली आहे. यासाठी २३ मंडयांमध्ये सुविधा देण्यात आली आहे.