पाकिस्तान: महाग साखरेमुळे ग्राहक हवालदिल

कराची : गेल्या आठवड्यात कराचीमध्ये किरकोळ साखरेचा दर १०५-११० रुपये प्रतिकिलो होता तर लाहोरमध्ये ग्राहकांना ८५-९० रुपये प्रतिकिलो ऐवजी ९३-१०० रुपये किलो दराने साखर विकत घ्यावी लागत आहे. महागलेल्या साखरेमुळे ग्राहक हवालदिल झाले आहेत.

क्वेटा येथे गेल्या आठवड्यातील ९५-९७ रुपयांच्या तुलनेत आता १०५-१०६ रुपये किलो दराने साखर मिळत आहे. मुल्तानमध्ये ४ मार्च रोजी साखरेचा दर ९५-९६ रुपयांच्या तुलनेत स्थिर राहीला तर बहावलपूरमध्ये हा दर १०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला.

कराची रिटेल ग्रॉसर्स ग्रुपचे (केआरजीजी) महासचिव फरीद कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार, साखरेचा घाऊक दर ९७ रुपये प्रतिकिलो आहे. मात्र, कराची घाऊक व्यापारी ग्रॉसर्स असोसिएशनचे (केडब्ल्यूजीए) अनीस मजीद यांनी साखरेचा घाऊक दर ९४ रुपये प्रतिकिलो असल्याचे सांगत, किरकोळ व्यापारी १०५-११० रुपये प्रतिकिलो दर लावून नफा कमवत असल्याचे सांगितले.

मजीद यांनी साखरेसह इतर वस्तूंच्या दरवाढीला सरकारचे गैर व्यवस्थापन कारणीभूत असल्याचा आरोप केला. गेल्यावर्षी सरकारने साखर आणि गव्हाबाबतच्या अहवालानंतरही कोणाविरोधातही कारवाई केली नाही. दोन्ही वस्तूंच्या साठेबाजांविरोधात काहीच झाले नाही असे माजीद म्हणाले. ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने (टीसीपी) पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि युटिलीटी स्टोअर्ससाठी ऑगस्ट-नोव्हेंबर २०२० यांदरम्यान १,३०,००० टन साखर आयात केली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here