इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गव्हाचा पुरेसा साठा आहे आणि परकीय चलन वाचवण्यासाठी गव्हाची खाजगी आयात करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गुरुवारी सांगितले. इस्लामाबादमध्ये नॅशनल फ्लड रिस्पॉन्स को-ऑर्डिनेशन सेंटरच्या बैठकीत शरीफ बोलत होते.
पंतप्रधानांच्या कार्यालयानेही एका निवेदनातून ही बाब स्पष्ट केली आहे. गेल्या महिन्यात आलेल्या भीषण पुरामुळे पाकिस्तान त्रस्त झाला आहे. पुरामुळे आतापर्यंत १७०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशाच्या बहुसंख्य भागाला पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे शेती, पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून एकूण अर्थव्यवस्थेला ३० अब्ज डॉलरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यांदरम्यान, पाकिस्तानमधील सरकारी एजन्सीने ५ लाख टन गहू खरेदी आणि आयात करण्यासाठी नवीन आंतरराष्ट्रीय निविदा जारी केली असल्याचे युरोपियन व्यापाऱ्यांनी सांगितल्यानंतर शरीफ यांचे हे विधान आले आहे. सरकार स्वस्त दरात गहू आयात करेल आणि त्याची तरतुद केली जाईल असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
पाकिस्तानमधील परकीय चलनाची गंगाजळी वाढवण्यासाठी आणि बचतीसाठी पर्याय शोधावे लागत आहेत. यामध्ये तेल आणि वायूच्या खरेदीचा समावेश आहे. गेल्या महिनाभरात आयातीत घट झाली आहे.















