पाकिस्तान आयात करणार भारताकडून साखर आणि कापूस

142

इस्लामाबाद : पाकिस्तानने भारताकडून साखर आणि कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री हम्माद अजहर यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली.

या निर्णयासह पाकिस्तानने शेजारी देशाकडून आयातीवर लागू केलेले निर्बंध हटविले आहेत. पाकिस्तानने २०१९ मध्ये काश्मीरच्या मुद्यावरून वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेजारील देशाकडून आयातीवर बंदी घातली होती.
अजहर यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक समन्वय समितीची (ईसीसी) बैठक झाली. त्यामध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी अजहर यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती केली होती.

अर्थमंत्री म्हणाले, बैठकीतील आराखड्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये भारताकडून कापूस आणि साखर आयातीच्या मुद्याचा समावेश होता. त्याबाबत विस्तृत चर्चेनंतर आयातीस मंजूरी देण्यात आली.
या वस्तूंची आयात सुरू झाल्यावर दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध काही प्रमाणात सुधारतील, जे पाच ऑगस्ट २०१९ नंतर खंडीत झाले होते. भारताने जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा मागे घेतल्याच्या निर्णयानंतर दोन्ही देशांतील व्यापार थंडावला होता.

भारताकडून खासगी व्यावसायिकांना ५ लाख टन पांढरी साखर आयात करण्यास अनुमती दिली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने इतर देशांकडून साखर आयातीस परवानगी दिली होती. मात्र, अन्य देशांतील साखरेचे दर चढेच असल्याचे ते म्हणाले. आमचा शेजारी देश, भारताकडे स्वस्त दरात साखर उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही भारतासोबत साखरेचा व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताकडून कापूस आयातीबाबत अजहर यांनी सांगितले की, कापसाची मागणी खूप वाढली आहे. कारण, पाकिस्तानमधील कापडाची निर्यात वाढली. मात्र, गेल्यावर्षी कापसाचे उत्पादन चांगले आलेले नाही. भारताकडून जून महिन्यापासून कापूस आयात सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले.

आम्ही देश आणि लोकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे असे अजहर म्हणाले. भारत जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे तर साखरेच्या उत्पादनाच्या बाबतीत तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंतप्रधानांचे वाणिज्य आणि गुंतवणूक विभागाचे सल्लागार दाऊस यांनी ईसीसीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here