होळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे द्या : जिल्हाधिकारी

शामली : जिल्हाधिकारी जसजित कौर यांनी जिल्हाधिकारी सभागृहातील बैठकीत ऊस बिलांच्या वितरणाचा आढावा घेतला. यावेळी पैसे देण्याच्या संथ गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. साखर कारखान्यंनी होळीपूर्वी ऊस उत्पादकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावेत असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ पासून साखर कारखान्यांचे गाळप सत्र सुरू आहे. आतापर्यंत २३८.३० लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात आला आहे. ऊस बिलांपोटी शेतकऱ्यांना एकूण ७२७.८६ कोटी रुपये देणे असल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. आतापर्यंत फक्त १००.५८ कोटी रुपयांची बिले अदा झाली आहेत. उर्वरीत ६२७.२८ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

शामली कारखान्याकडे सर्वात कमी ५.४६ टक्के ऊस बिले थकीत आहेत. ऊन कारखान्याकडे २२.६४ टक्के आणि थानाभवान कारखान्याकडे १४ टक्के बिले थकीत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस बिले देण्यास टाळाटाळ केल्यास खपवून घेतले जाणार नाही असे सांगितले. यावेळी शामली कारखान्याचे युनिट हेड व्ही. सी. त्यागी, महा व्यवस्थापक डॉ. कुलदिप पिलानिया, थानाभवन चे युनिट हेड वीरपाल सिंह, महा व्यवस्थापक जे. बी. तोमर, अकाउंट हेड सुभाष बहुगुणा, ऊन साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक अनिल कुमार अहलावत, अकाऊंट हेड विक्रम सिंह उपस्थित होते. दरम्यान होळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा रालोदचे युवा नेते राजन जावला यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here