दुसऱ्या हप्त्याचे प्रति टन 400 रूपये तत्काळ द्या : ‘स्वाभिमानी’ची उपमुख्यमंत्री पवारांकडे मागणी

कोल्हापूर : यंदा साखरेसह उपपदार्थांना चांगला दर मिळाल्यामुळे साखर कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले आहेत. दुसरीकडे महागाईने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील ऊस ऊत्पादकांना दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति टन किमान 400 रूपये देण्याबाबत साखर कारखानदारांना आदेश करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच कारखानदारांना सुचना करू, असे आश्वासन दिले.

महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्यात एफआरपी देण्याचा कायदा केला होता. हा कायदा बदलून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, अजूनही त्याचा शासन निर्णय झालेला नाही. संबधित शासन निर्णय तातडीने व्हावा, महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमाफी जाहीर केली आहे. या यादीतील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50 हजार रूपये कागदपत्रांची पूर्तता होऊनही मिळालेले नाहीत. हे अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली.

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काटामारीचे प्रमाण वाढले आहे. कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात आली आहे. वजन काटे ऑनलाईन करण्याबाबत मी आग्रही असून साखर कारखान्यांनी मॅनलेस वजनकाटे उभारावेत, यासाठी सूचना केल्या जातील, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष प्रा.डॅा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, जर्नादन पाटील, शैलेश आडके, सागर शंभुशेटे, सागर मादनाईक, आण्णा मगदूम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here