इस्लामाबाद : आर्थिक संकटादरम्यान पाकिस्तानमध्ये एका दिवसात २४ रुपयांच्या दरवाढीनंतर पेट्रोलची किंमत प्रती लिटर २३३.८९ रुपयांवर पोहोचली आहे. तर डिझेलमध्ये करण्यात आलेल्या १६.३१ रुपयांच्या वाढीनंतर त्याचा दर २६३.३१ रुपये प्रती लिटर झाला आहे. गेल्या वीस दिवसांत पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आली आहे.
इस्लामाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानचे वित्त मंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी सांगितले की, नवे दर १५ जूनच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. रॉकेलचा दर २९.४९ रुपये वाढीनंतर २११.४३ रुपये प्रती लिटर झाली आहे. तर साध्या डिझेलचा किंमत २९.१६ रुपये वाढीनंतर २०७य४७ रुपये झाली आहे. मिफ्ताह इस्माईल यांनी सांगितले की, सरकारकडे आंतरराष्ट्रीय किमतींचा भार पाकिस्तानमधील ग्राहकांवर टाकण्याशिवाय अन्य कोणताही परिणाम नाही. पाकिस्तान सरकारने गेल्या वीस दिवसांत पेट्रोलच्या दरात ८४ रुपये प्रती लिटरपेक्षा अधिक वाढ केली आहे.
वित्त मंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही देशात आताही पेट्रोल दरात २४.०३ रुपये डिझेलमध्ये ५९.१६ रुपये रॉकेलमध्ये २९.४९ रुपये आणि साध्या डिझेलमध्ये २९.१६ रुपयांचे नुकसान सोसत आहोत. ते म्हणाले की, सरकार पेट्रोलवरील अनुदानावर १२० अब्ज रुपये खर्च करीत आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढीच्या दरम्यान पाकिस्तानने आपल्या नागरिकांना चहाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानच्या योजना आणि विकास मंत्री अहसान इक्बाल यांनी लोकांनी चहा कमी प्यावा असे आवाहन केले.
पाकिस्तानमध्ये डाळ, साखर, भाजीपाला, फळांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. अहवालानुसार पाकिस्तान सरकारने अलिकडेच आयात खर्च घटविण्यासाठी ४१ वस्तूंच्या आयातीवर दोन महिन्यांसाठी निर्बंध लादले आहे. मात्र, या आयात निर्बंधातून महसूला फारशी वाढ झाली नाही. पाकिस्तानला आपली आयात कमी करण्याचा ६० कोटी डॉलरचा फायदा झाला आहे.