इंधन वितरण कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल ७६ ते ८५ पैसे आणि डिझेल ६७ ते ७५ पैसे प्रती लिटरने महागले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर ८० पैसे आणि डिझेल ८० पैशांनी वाढले आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात ८४ पैसे तर डिझेलच्या दरात ७५ पैशांची वाढ झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ८४ पैसे तर डिझेल ८० पैशांनी वाढले आहे. अशाच पद्धतीने चेन्नईत पेट्रोल, डिझेलमध्ये अनुक्रमे ७५ आणि ७६ पैशांची वाढ झाली आहे. इंधन कंपन्यांनी ४ नोव्हेंबर २०२१ नंतर २२ मार्चपर्यंत दरवाढ केली नव्हती.
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना दरवाढ करण्यापासून रोखल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ११२ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी डिझेलच्या घाऊक खरेदी दरात २५ रुपयांची वाढ केली होती. किरकोळ दरात हळूहळू वाढ होईल असे वितरकांनी सांगितले होते. नव्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल १०१.०१ रुपये तर डिझेल ९२.२७ पैसे प्रती लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल ११५.८८ रुपये तर डिझेल १००.१० रुपये प्रती लिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ११०.५२ रुपये आणि डिझेल ९५.४२ रुपये प्रती लिटर झाले आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०६.६९ रुपये आणि डिझेल ९६.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे.
देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाख या राज्यांत पेट्रोल १०० रुपयांवर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. पेट्रोल, डिझेलचा दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या वेबसाईटवर जाऊन तु्म्हाला RSP लिहून आपल्या शहराचा कोड लिहावा लागेल.हा मेसेज ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.