देशाच्या आर्थिक आघाडीवर चांगले वृत्त समोर येत आहे. यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेने गती घेतल्याचे दिसून येत आहे. प्रसार माध्यमातील वृत्तांनुसार देशाच्या कृषी क्षेत्रातील खप वाढल्याने देशात डिसेंबर महिन्यात पेट्रोल, डिझेलची मागणी वार्षिक आधारावर वाढली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये पेट्रोलची विक्री ८.६ टक्क्यांनी वाढून २७.६ लाख टन झाली आहे. तर २०२१ मध्ये या महिन्यात ही विक्री २५.४ लाख टन होती.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड १९ महामारीच्या काळात गेल्या दोन वर्षात भारताला खूप मोठा फटका बसला. डिसेंबर २०२० मध्ये इंधन विक्री १३.३ टक्के आणि महामारीपूर्वी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये इंधन विक्री २३.२ टक्के जास्त होती. तर मासिक आधारावर विक्रीत ३.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात डिझेल इंधन सर्वाधिक विक्री केले जाते. त्याची विक्री डिसेंबर २०२२ मध्ये १३ टक्क्यांनी वाढून ७३ लाख टन झाले. डिसेंबर २०२० च्या तुलनेत डिझेलचा खप १४.८ टक्के आणि २०१९ च्या तुलनेत ११.३ टक्क्यांनी वाढलेला आहे. नोव्हेंबर महिन्यात डिझेल विक्रीत थोडी घट झाली होती. विमान क्षेत्र खुले झाल्याने विमान इंधन (एटीएफ)चा खप १८ टक्क्यांनी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. घरगुती गॅसच्या विक्रीतही वाढ झाली आहे.