तेल कंपन्यांकडून आज पुन्हा पेट्रोल-डिझेलची दरवाढ

इंधन कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचा दर २८ ते ३२ पैसे आणि डिझेलचा दर ३३ ते ३७ पैशांनी वाढले आहेत. दिल्लीत आता एक लिटर पेट्रोल ९९.४१ रुपये तर डिझेल ९०.७७ रुपये प्रती लिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोल ११४.१९ रुपये आणि डिझेल ९८.५० रुपये प्रती लिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०८.८५ रुपये तर डिझेल ९३.९२ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०५.१८ रुपये आणि डिझेल ९५.३३ रुपये प्रती लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरनंतर इंधन कंपन्यांनी दरात कोणतीही वाढ केली नव्हती.

केंद्र सरकारने पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तेल कंपन्यांना दरवाढ करण्यास रोखल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ११२ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्यानंतर रविवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या घाऊक खरेदी दरात २५ रुपये प्रती लिटरची वाढ केली होती. किरकोळ दरात हळूहळू वाढ करण्यात येणार असल्याचे इंधन वितरकांचे म्हणणे आहे.

सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर प्रती लिटर दरात मिळत आहे. महानगरांपैकी मुंबईत इंधन दर सर्वाधिक आहेत.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत असतात. सकाळी सहा वाजता हे दर बदलले जातात. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here