सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ

40

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढीचे सत्र सुरूच आहे. अनेक शहरांमध्ये इंधनाच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३५ पैशांची वाढ करण्यात आली. कालही इंधन दर ३५ पैशांनी वाढविण्यात आले होते.

भारतीय पेट्रोलियम वितरण कंपन्यांनी आज, शुक्रवारी (दि. २२ ऑक्टोबर) पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ केली. तर डिझेलच्या दरात तेवढीच म्हणजे ३५ पैशांची वाढ झाली आहे. अपडेट आकडेवारीनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल १०६.८९ रुपये प्रती लिटर मुंबईत ११२.७८ रुपे प्रती लिटरवर पोहोचले आहे. मुंबईमध्ये डिझेल १०३.६३ रुपये आणि दिल्लीत ९५.६२ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०७.४४ रुपये तर डिझेल ९८.७३ रुपये प्रती लिटरवर आहे. चेन्नईक पेट्रोल १०३.९२ रुपये आणि डिझेल ९९.९२ रुपये प्रती लिटरवर आहे.

ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत १७ वेळा इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. तीन दिवसांचा अपवाद वगळला तर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. या एकाच महिन्यात पेट्रोल ५.२५ रुपयांनी आणि डिझेल ५.८५ रुपयांनी महागले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. याशिवाय रब्बी पिकांच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.

रांची मध्ये पेट्रोल १०१.२३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल १००.९० रुपये प्रती लिटर झाले आहे. मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पेट्रोल ११७.८९ रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेल १०७.०८ रुपये प्रती लिटरने विक्री केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकलेल्या आहेत. कच्चे तेल उच्चांकी पातळीवर आहे. गुरुवारी ब्रेंट क्रूड काहीसे घसरुन ८४.६१ डॉलर प्रती बॅरल आणि अमेरिकन क्रूड ८२.५० डॉलर प्रती बॅरल झाले. गेल्या आठवड्यात या दोन्हींमध्ये जवळपास तीन टक्के तेजी दिसून आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here