नवी दिल्ली : आज, मंगळवारी सलग ५१ व्या दिवशीही पेट्रोल, डिझेलचे दर बदललेले नाहीत. ऑईल वितरण कंपन्यांनी १२ जुलैसाठी नवे दर जारी केले आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावर दबाव वाढला आहे. क्रूड ऑईल सध्या १०६ डॉलर प्रती बॅरलच्या स्तरावर आहे. दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये आणि डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये तर डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली, मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये २२ मे रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात बदल झाले होते. त्यावेळी सरकारने इंधनावरील एक्साइज ड्यूटीमध्ये कपात केली होती. पेट्रोलवर प्रती लिटर ८ रुपये आणि डिझेलवर प्रती लिटर ६ रुपयांची कपात केली होती. २२ मे नंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्याने सरकारने विंडफॉल टॅक्सची घोषणा केली आहे. त्यातून देशांतर्गत इंधन उत्पादनावर प्रती टन २२,३५० रुपये जादा कर आकारणी केली जाईल. याशिवाय देशांतर्गत बाजारातून निर्यात केल्या जाणाऱ्या पेट्रोलियमवर एक्स्पोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे. पेट्रोल आणि जेट फ्यूएलवर ६ रुपये आणि डिझेलवर प्रती लिटर १३ रुपये एक्स्पोर्ट ड्यूटी लागू करण्यात आली आहे.