मनीला : फिलिपाईन्स सरकारने ग्राहकांसाठी ठराविक दराने प्रक्रिया केलेल्या साखर विक्री करण्याची योजना तयार केली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्वस्त दराने साखरेचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी आणि महागाई रोखण्यासाठी हा एक तात्पुरता उपाय आहे. सरकारने साखर आयातदारांना साखर नियामक प्रशासनाच्या माध्यमातून ७० पेसो प्रती किलो दराने साखर विक्री करण्यास सांगितले आहे. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत तुटवडा असल्याने साखरेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा भार सोसावा लागत आहे.
स्थानीक बाजारपेठांत गेल्या काही महिन्यांत रिफाईंड साखरेच्या किमती वाढून १०० पेसो प्रती किलोपेक्षा अधिक झाल्या आहेत. २०२१ च्या अखेरीस हा दर निम्म्याने कमी होता. त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांना किमतीमध्ये ४० टक्के कपात करण्याचे आवाहन केले आहे. फिलिपाईन्समध्ये महागाई गेल्या चार वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. मुख्यत्वे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. फिलिपाइन्स यावर्षी अतिरिक्त १,५०,००० टन प्रक्रिया केलेल्या साखरेची आयात करणार आहे. त्याचा निम्मा हिस्सा शीतपेय निर्मात्यांसह औद्योगिक वापरकर्त्यांकडून आणला जाईल.