केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली निर्यात प्रोत्साहन परिषद आणि उद्योग संस्थांसोबत निर्यातीबाबत आढावा बैठक

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत निर्यात प्रोत्साहन परिषद आणि उद्योग संस्थांसोबत निर्यातीतील क्षेत्रीय प्रगतीचा आढावा घेतला.

या आढावा बैठकीला वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, निर्यात प्रोत्साहन परिषदांचे प्रतिनिधी, उद्योग संघटना आणि वाणिज्य विभाग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वाणिज्य मंत्र्यांनी निर्यात प्रोत्साहन परिषदेला, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षीचा निर्यात वाढीचा नोंदवलेला वेग कायम राखण्याचे आवाहन केले.

सध्या जागतिक बाजारपेठेत असलेल्या अडथळ्यांचा आपल्या बाजूने उपयोग करत काही देशांचे व्यापारातले स्थान आपण प्राप्त करावे असे आवाहन गोयल यांनी विविध उद्योग क्षेत्रातील धुरिणांना केले. भारतीय उद्योगांनी एकमेकांना सहकार्य करावे आणि राष्ट्रवादाच्या भावनेने प्रेरित व्हावे असे त्यांनी सांगितले.

अल्पमुदतीतील आव्हानांना तोंड देऊन आपल्या मूल्य रचनेत तात्पुरता बदल करावा लागला तरी उद्योगांनी निर्यात बाजार टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. निर्यातदारांनी चांगल्या निर्यात क्षमता असलेल्या अद्वितीय उत्पादनांचा शोध घ्यावा असे सांगून त्यांनी एरंड सारख्या उत्पादनाचे उदाहरण दिले तसेच संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रियपणे सहकार्य करावं, अशी सूचना गोयल यांनी केली.

भारतीय उत्पादनांना निर्यातीसाठी अधिकाधिक संधी मिळावी यादृष्टीने विविध क्षेत्र, वस्तू आणि बाजारपेठांच्या माहितीच्या आधारे निर्यात डेटाचे विश्लेषण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. निर्यात प्रोत्साहन परिषद आणि उद्योग संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी सरकार सोबत खुली चर्चा केल्यास त्या लगेचच लक्षात येऊन त्यांचे निराकरण वेळीच होऊ शकेल, असे गोयल म्हणाले.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here