मुंबई : कोविड १९च्या दुसऱ्या लाटेतून सावरत असताना आता महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. मात्र, ही तिसरी लाट आली तरी त्यामध्ये कारखानदारी आणि ऊस हंगामात अडथळे येऊ नयेत यासाठी एक्शन प्लॅन तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यांतील मोठे उद्योग आणि कारखानदारांशी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे बैठका आयोजित कराव्यात. कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तरी त्यामध्ये कारखाने सुरू कसे ठेवता येतील यासंबंधी नियोजन करण्यास कारखानदारांना मार्गदर्शन करण्यात यावे.
ज्या कारखान्यांना शक्य आहे, ते आपल्या कामगारांची निवासाची व्यवस्था कारखान्याच्या आवारात करू शकतात. अशी व्यवस्था ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या कामगारांची व्यवस्था परिसरात करावी. त्यांची ने-आण करणे सोपे होईल अशा पद्धतीच्या व्यवस्थेची तयारी करावी. जे कारखानदार आपल्या कामगारांची व्यवस्था करू शकतात, त्यासंबंधीचे नियोजन तातडीने केले जावे अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत झालेल्या या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link