नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधी पक्षांच्या सरकारांना लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन केले. पेट्रोल, डिझेलच्या दरांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्क कपात केली होती. पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही राज्यांना कर कमी करण्यासाठी आवाहन केले होते. काही राज्यांनी कर कमी केले आहेत. त्यांनी कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. मात्र, काही राज्यांनी असे केलेले नाही.
विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेल्या राज्यांची नावे घेऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामीळनाडू या राज्यांनी केंद्र सरकारच्या सल्ल्याचे पालन केलेले नाही. या राज्यांतील लोकांना दरवाढ सहन करावी लागत आहे. ते म्हणाले की, मी या राज्यांना आवाहन करतो की आम्ही नोव्हेंबरमध्ये जे केले, त्याचे पालन करण्याची गरज आहे. व्हॅट कमी करून आपल्या नागरिकांवरील कराचे ओझे कमी करावे. कोविड १९च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेवेळी मोदी यांनी ही टीप्पणी केली.
केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ व १० रुपयांनी कमी केले होते. केंद्राच्या निर्णयानंतर २५ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशात, बहुसंख्य भाजपशासीत राज्यांनी याची अंमलबजावणी केली होती. त्यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कपात केली होती.